कैरो - इजिप्तमधील पिरॅमिड हे केवळ पर्यटकांनाच नाही, तर जगभरातील पुरातत्त्व संशोधकांनाही आकर्षित करत असतात. गेल्या सुमारे दीड शतकांपासून पिरॅमिडचे संशोधन चालू आहे आणि यापुढेही चालूच राहणार आहे. इजिप्तच्या पुरातत्त्व खात्यातर्फेही सातत्याने संशोधन चालू आहे. त्यासाठी नवनव्या जागी उत्खनने चालू आहेत.
नुकत्याच झालेल्या एका उत्खननानंतर, एक अकल्पित सत्य उघडकीस आले आहे. संशोधकांना खुणावणारी ही पिरॅमिड्‌स गुलामांनी बांधलेली नाहीतच, तर स्वतंत्र लोकांनी बांधलेली आहेत, असा निष्कर्ष इजिप्तच्या पुरातत्त्व खात्याच्या मुख्य अधिकाऱ्याने जाहीर केले आहे.
झाही हवास हा अधिकारी म्हणाला, की इजिप्तमध्ये गेल्या काही वर्षांत नवनवीन पिरॅमिड्‌स सापडत आहेत. गिझा परिसरात नुकत्याच झालेल्या एका उत्खननात सापडलेला एक पिरॅमिड चक्क "फॅरो'च्या (इजिप्तचे सम्राट) पिरॅमिडशेजारी आढळला आहे. यावरून हे पिरॅमिड गुलामांनी बांधलेले नव्हते, याचा सबळ पुरावाच आहे. हवास हे इजिप्त सरकारतर्फे उत्खनन करणाऱ्या पथकाचे प्रमुख आहेत.
हे कामगार गुलाम असते, तर त्यांना "फॅरो'च्या पिरॅमिडजवळ आपली कबर बांधताच आली नसती. १९९० च्या दशकातही कामगारांची थडगी सापडली होती. ती देखिल हेच सिद्ध करतात. विसाव्या आणि एकविसाव्या शतकातील हा एक मोठाच शोध ठरला आहे. इजिप्तचे सम्राट खुफू आणि खाफ्रे यांच्यासाठी पिरॅमिड बांधणाऱ्या कामगारांचीच ही थडगी आहेत, असे हवास यांनी सांगितले.
हवास यांना यापूर्वी काही कामगारांच्या थडग्यांवर चित्रलिपी आढळली होती. त्यात "खुफू'चे मित्र, असा उल्लेख करण्यात आला आहे. ते गुलाम नसल्याचा हा आणखी एक पुरावा असल्याचे हवास यांचे म्हणणे आहे. ते म्हणाले, की अनेक पिरॅमिड गुलांमांनीच बांधल्याचा दावा, अनेक चित्रपट आणि प्रसारमाध्यमांतूनही सातत्याने करण्यात येतो आहे. कैरो शहराच्या पश्चिमेकडील गिझाच्या पठारावरील पिरॅमिड्‌स ४,५१० वर्षांपूर्वी उभारण्यात आली होती.
हवास म्हणाले, की नाईल नदीच्या किनाऱ्यावरील आणि उत्तर इजिप्तमधील शेतकरी, पिरॅमिड उभारणाऱ्या सुमारे दहा हजार कामगारांसाठी रोज २१ म्हशी आणि २३ शेळ्या पाठवत होते, याचा पुरावाही मिळालेला आहे. ग्रीसचे इतिहासकार हिरोडोटस याने एक लाख कामगार असल्याचा उल्लेख केला आहे.
प्राचीन इजिप्त सरकारने कामगारांना अन्न पाठवणाऱ्या शेतकऱ्यांचा कर माफ केला होता, याचीही इतिहासात नोंद आहे. यावरून हे शेतकरी राष्ट्रीय प्रकल्पात सहभागी असल्याचेही स्पष्ट होते. कामगारांच्या थडग्यांचा शोध १९९० मध्ये अचानकपणे लागला. एका स्वाराचा घोडा पक्‍क्‍या विटांच्या बांधकामाजवळ धडपडल्यामुळे या कबरींचा शोध लागला, असेही हवास यांनी सांगितले.