न्यू यॉर्क - चीनमधील मानवाधिकार समितीच्या कार्यकर्त्यांच्या ई-मेल आयडी हॅक करण्याच्या प्रकारांत मोठी वाढ झाल्यामुळे, जी-मेलसह अनेक सेवा उपलब्ध करून देणा-या गूगल डॉट कॉमने चीनमधून गाशा गुंडाळण्याचा इशारा दिला आहे. चिनी हॅकर्स अत्यंत सफाईदारपणे मेल आयडी हॅक करत असल्याचा दावा, गूगलचे चीनमधील कॉर्पोरेट विकास विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि मुख्य कायदा अधिकारी डेव्हि़ड ड्रमंड यांनी केला आहे.

या संदर्भात ड्रमंड यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये म्हटले आहे, की गेल्या वर्षभरापासून चीन सरकारकडून मेल आणि वेबसाईटवर होणा-या हल्ल्यांचा तपास करण्यात येत होता. ई-मेलवरील अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि लेखन स्वातंत्र्यावर मर्यादा घालण्याच्या उद्देशाने हा तपास चालू होता. सरकारच्या कृपाप्रसादामुळेच ई-मेल आयडी हॅक करण्यात येत असल्याचे उघड झाल्यामुळे, चीनमधील व्यवसाय चालू ठेवण्याबाबत फेरविचार करण्याची वेळ आली आहे.

गूगलच्या सेवांवर निर्बंध घालण्याचा प्रकार चालू असल्यामुळे, आम्हाला येथे राहण्यात रस उरलेला नाही. पुढील काही आठवडे या संदर्भात आम्ही चीन सरकारशी चर्चा करणार आहोत. आमच्या सेवा कोणत्याही निर्बंधाशिवाय चालू राहिल्या पाहिजेत, या मुद्द्यांवर आमचा भर असेल. चीन सरकारने आमच्या मागण्या मान्य न केल्यास, या देशातून गाशा गुंडाळण्याशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय नसेल, असे ड्रमंड यांनी म्हटले आहे.

ड्रमंड म्हणतात, की गेल्या डिसेंबरपासूनच गूगलच्या सेवांवर पद्धतशीरपणे आणि प्रामुख्याने चीनमधून हल्ले होत असल्याचे स्पष्ट झाले होते. बौद्धिक स्वामित्त्वावर हा घाला असल्याचे आमचे मत आहे. गूगलव्यतिरिक्त अर्थ, इंटरनेट, प्रसारमाध्यमे आणि तंत्रज्ञानाशी निगडित असलेल्या किमान २० कंपन्यांच्या वेबसाईट आणि ई-मेलवरही हल्ले होत असल्याचे गूगलच्या निदर्शनास आले आहे.

असे हल्ले होत असलेल्या कंपन्यांच्या वरिष्ठ अधिका-यांना या प्रकारांची गूगलतर्फे माहिती देण्यात येत आहे, त्याचबरोबर संबंधित अमेरिकी अधिका-यांशीही चर्चा चालू आहे. चीनमधील परिस्थिती आणि नवीन कायदे व गूगलच्या सेवांवरील निर्बंधांकडे बारकाईने पाहण्यात येईल, असे ड्रमंड यांनी जानेवारी २००६ मध्येच वक्तव्य केल्याचा उल्लेखही त्यांनी आपल्या ब्लॉगमध्ये केला आहे.