ऐनवेळी बदललेला बेत एक थरारक अनुभव पदरात टाकून जाईल याची आम्हाला तेव्हा कल्पनाच नव्हती! ऐन पावसात एकांतातल्या रांगड्या मकरंदगडाने दिलेल्या त्या धमाल अनुभवाबद्दल त्याच्या ऋणात राहणंच मी पसंत करेन...
आधी बेत ठरला होता चंद्रगड ऊर्फ रामचंद्रगडावर जाण्याचा. नेटवरचे चंद्रगडाचे फोटो पाहून आणि त्याचे कातिल रूपडे पाहून आम्ही खुळावलो होतो. चंद्रगडाचा परिसर असला असेल, तर खुद्द गडावर काय स्थिती असेल या कल्पनेनेही कधी एकदा त्या गडावर स्वारी करतो अशी आमची स्थिती झाली होती. महाबळेश्‍वरहूनही चंद्रगडाला जाता येत असल्याची माहिती आमच्या एका भटक्‍या मित्राने दिली होती आणि त्यासाठी एका पूर्ण दिवसाची तंगडतोड करावी लागत असल्याचंही तो बोलला होता. ऐन पावसाळ्यात दरीत उतरण्याच्या कल्पनेमने मी तर खचलोच होतो. बाकी मंडळी तयार होती; पण संपूर्ण एक दिवस तंगडतोड आणि रात्री मुक्कामाएवढा वेळ नसल्याने सरळ दुसऱ्या मार्गाने जावं असं ठरलं. चंद्रगडावर जाण्यासाठी वाई-जोर-ढवळ्याघाट-ढवळ्या गाव-चंद्रगड असा दुसरा मार्ग शोधाशोधीत कळाला होता. त्याच रस्त्याने जाण्याचा निर्णय पक्का झाला. नेहमीप्रमाणे रविवारचा बेत ठरला. यावेळी एक नवा भिडू आमच्या टोळक्‍यात सामील झाला होता आणि पहिल्याच ट्रेकमध्ये एक थरारक अनुभव त्याच्या पदरात पडला. ठरल्यावेळी आम्ही जमलो आणि (नेहमीप्रमाणे) मिसळ-चहाला न्याय देऊन सातारा रस्त्याने मार्गी लागलो.
गाडी धावत असताना चंद्रगडाबाबत चर्चा सुरू झाली. ढवळ्या घाटातून गाडी जाऊ शकत नसल्याचं वर्तमान एका मित्राने दिल्यावर काय करावं असा प्रश्‍न पडला. सुदैवाने या मित्राने महाबळेश्‍वरचं एक जुनंपानं पॅंप्लेट आणलं होतं नि ते पाहत असताना प्रतापगडाजवळचा मकरंदगड पाहता येईल हे लक्षात आलं. आमच्यापैकी कोणी कधी मकरंदगडाला गेला नव्हता. मी फक्त त्या गडाबाबत ऐकलं होतं आणि य वर्षांपूर्वी केलेल्या अशाच एका ट्रेकमध्ये घोड्याच्या खोगिराप्रमाणे दिसणाऱ्या या गडाचं लांबून दर्शन घेतल्याचं लक्षात आलं.
झालं. बेत बदलला आणि वाईकडे वळू पाहणारी गाडीची चाकं महाबळेश्‍वरच्या घाटाकडे सरकली. महाबळेश्‍वर पार करून आम्ही आंबेनळीच्या घाटात शिरलो. आता माहितीनुसार पुढे पार हे गाव आणि तेथून पुढे मकरंदगड. गाडी पारच्या फाट्यावरून वळाली तेव्हा पहिल्याच पुलावर काही पोरं खेकडे पकडण्याच्या मोहिमेत गुंतलेली दिसली. त्यांना माहिती विचारल्यावर सरळ पारकडे जावा हे उत्तर मिळालं. रस्ता मस्तच होता. दोन्ही बाजूंना दाट झाडी. कधी डाव्या हाताला खोल दरी आणि डोंगरांचे सुळके असा तो मार्ग होता. रस्त्यावर उजवीकडे पार गावाची पाटी दिसल्यावर आम्ही तिकडे वळालो. या भागात पावसाची कृपादृष्टी असल्यामुळे सगळीकडे खलास हिरवाई होती. मध्ये एका ठिकाणी थांबलो तेव्हा कळलावी फुलाचं नि नंतर एका देखण्या फुलपाखराची सुरेख छायाचित्रे मिळाली. गावात पोचल्यावर मकरंदगड पार विरुद्ध दिशेला असल्याची माहिती मिळाली आणि अबौटटर्न करत पुन्हा आम्ही रस्त्याला लागलो. शिरवली-हातलोट रस्त्याने जायचं होतं. निघालो. हातलोटच्या अलिकडे एक लैच फर्मास जागा भेटली. दाट जंगल नि मधून जाणारा एकाकी शांत रस्ता. झाडं एवढी उंची आणि दाट होती, की भरदिवसाही तेथे अंधारलं होतं. त्या जागेला आम्ही अंधारबन असं नाव देऊन टाकलं. फोटो काढण्यात जरा जास्तच वेळ गेल्याचं लक्षात आल्यावर मात्र घाई करून निघालो. हातलोट दिसायला लागलं आणि डावीकडे मकरंदगड सामोरा आला. खरं तर मधु-मकरंदगड असे हे जोड किल्ले आहेत. पण मधुगडावर जायला रस्ता राहिला नसल्याचं समजल्याने फक्त मकरंदगडावर जायचं पक्कं केलं. गावात शिरलो आणि पाऊस अक्षरशः कोसळायला लागला. गावातले एक भगवंतराव बरोबर यायला तयार झाले. भर पावसात रस्त्याला लागलो. मकंरदगड तसा फार अवघड वगैरे नाही. रस्ताही दाट जंगलातून जातो. वाट म्हणजे केवळ सुख. सभोवताली पसरलेली हिरवीगार भात शेती, त्यात लाल कौलांची
छोटी घरं, मधून जाणारी चिखलाची पायवाट आणि मागे ढगांचा बुरखा पांघरलेला टंगाळ्या मकरंदगड. निसर्गाचा एक भव्य कॅनव्हास समोर उलगडला होता. त्यात बुडून जाणं हेच शहाणपणाचं लक्षण. चढणीला लागलो तेव्हा भगवंतरावांनी जळवांपासून सावध राहण्याचा इशारा दिला. त्यांच्या इशाऱ्याचं प्रत्यंतर काही वेळातच आलं. नव्याने सामील झालेल्या उमेशवर एका जळवेने हल्ला केला. पहिल्यांदा काही लक्षात आलं नाही; पण वाटाड्याची नजर बारीक असल्याने त्याने ती जळूबाई काढली. मग बाकीचेही सावध झाले. रस्ता चढणीचा होत होता आणि आम्ही चालत होतो. जंगलात गवे भरपूर असल्याची माहिती मिळाल्यावर आम्ही जरा जास्तच खूश झालो होतो. प्रत्यक्षात गवा सामोरा आला असता तर काय झालं असतं ही वेगळी बाब! वाटेत भूछत्रांनी लगडलेलं एक झाड माझापण फोटू काढा म्हणत सामोरं आलं. कसली भूछत्रं लगडली होती त्या झाडाला. फोटो अपरिहार्यच होते. आता वाट सरळ पठारावरून जात होती. मी आणि राकेश पुढे होतो. अचानक एका वळणावर पंखांचा फडफडाट ऐकू आला आणि समोरच एका देखण्या रानकोंबड्याने पंख फलकावत खालच्या दरीतल्या जंगलात सूर मारला. एवढ्या वेगाने तो गडी पळाला, की कॅमेरे असूनही आम्ही काही करू शकलो नाही. वाटेतल्या एका ओहोळात लालभडक खेकडेबुवा नांग्या सरसावून उभे होते. आम्ही जावळ गेल्यावर मात्र ते बुवा पळाले आणि एका खडकाबुडी त्यांनी आश्रय घेतला. आम्ही त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचं छायाचित्रण केलं.
वाटेचा पहिला टप्पा आता संपला होता. समोर होतं घोणसूर. याला सरळ घोणसपूरही म्हणतात. घोणसूरचं मल्लिकार्जुनाचं देऊळ समोर उभं होतं. आता शिरलो. मस्त न्याहारी केली, पाणी ढोसून हुषार झालो नि पुढल्या वाटेला चालू पडलो. समोर मकरंदगड दिसत होता; पण वाट मुरमाची नि चढणीची होती. सटकत, आधार घेत जात राहिलो. समोर भलं मोठं बुरजाप्रमाणे टेंगूळ दिसत होतं; पण वाट त्याच्या उजवीकडून होती. बाजूला दरी, डावीकडे कडा आणि मधून वाट असा प्रकार. गेलो. अखेर एकदाचे मकरंदगडावर पोहोचलो. भगवंतरावांनी आम्हाला थेट पाण्याच्या टाक्‍याकडे नेलं. तसं या गडावर आता काही बांधकाम शिल्लकही नाही. टाक्‍यातल्या थंड आणि नितळ पाण्याने आमचे श्रम विसरायला लावले.
आता खरी परीक्षा सुरू होणार होती...
पाण्याच्या टाक्‍याच्या वरच्या बाजूला शंकराचं एक मंदिर आहे. त्याला जायला दोन वाटा आहेत. एक जरा लांबून फिरून जाते; पण सुरक्षित आहे. दुसरी वाट भगवंतरावांसारख्या स्थानिकांचा शॉर्टकट असला, तरी आपल्यासारख्यांची पुरती वाट लावणारी आहे. (अर्थात ही बाब आम्हाला वाटेला लागल्यावर लक्षात आली) वाटाडे मामा पुढे निघाले. टाक्‍याच्या शेजारूनच हा शॉर्टकट जातो. ही वाट म्हणजे कड्याच्या उतारावरचे उंच खडक आणि गवतातून जाणारा मार्ग आहे. "जरा जपून यावा बरं का,' म्हणत मामा वाटेने चढायला लागले. एकावेळी एक भिडू जाऊ शकेल एवढीच वाटेची रूंदी. मामांच्या मागे राकेश, मग नवखा उमेश, मग अरविंद आणि मी सगळ्यांत शेवटी. पावसामुळे पायाखालची जमीन जबर निसरडी झालेली, पुढे गेलेल्यांमुळे माती आणखीच घसरडी झालेली. उंच खडकांवर चढताना कसरतच करावी लागत होती. बरं, हाताने काही पकड घ्यावी, तर बाजूला होती काटेरी झुडपं आणि ओलं गवत. सरळसोट चढण, पाय चुकून जरी घसरला किंवा हाताची पकड निसटली, तर मागे खोल दरी वाट पाहतच होती. उजवीकडे टाक्‍याचे कातळ... अक्षरशः इंच इंच लढवत आम्ही वर जात होतो. मामा मधूनच धीर देत होते. या वाटेने पुन्हा उतरायचं नाही असं त्यांनी सुरवातीलाच सांगितल्यामुळे आमचं थोडं धैर्य टिकून होतं. चढण फार उंचीची नाही; पण तरी साधारणतः साडेतीनशे फुटांची तरी आहे. वर जाताना खाली पाहणं अर्थातच शक्‍य नव्हतं. या गडबडीत एका खडकाची पकडच मला घेता येईना. पावसामुळे तो ओलाचिंब झाला होताच; शिवाय शेवाळलाही होता. इकडे पायांखालचा दगड निसटू पाहत होता. अखेर जोर लावत पाय उचलत एका मोठ्या झुडपाची पकड घेतली. नेमकं ते काट्याचं झुडूप निघालं. एक काटा बोटात कच्‌कन घुसला, रक्तही वाहायला लागलं, पण झुडपाने आधार दिला; दगा दिला नाही. एकदाचा तो खडक पार केला आणि समोर मल्लिकार्जुनाचं मंदिरच दिसलं... निरव शांततेत देव जणू समाधी लावून ब
सला होता... आता पुन्हा या वाटेने परतायचं नाही म्हणून आम्ही जल्लोश केला. मंदिर धुक्‍याने वेढलेलं होतं, पण आत पाण्याची कळशी भरलेली होती. तहानेने आम्ही हैराण झालोच होतो; पण देवाला काळजी होती... जरा स्थिरस्थावर झाल्यावर खाली नजर टाकली आणि या वाटेने आपण वर आलो यावर विश्‍वासच बसला नाही... पुन्हा कधी पावसाळ्यात असल्या धोकादायक वाटेने वर यायचं नाही हेही लगेच ठरवून टाकलं.
बसून भागणार नव्हतं. पाऊस पडायला लागला होता. धुकं दाटायला लागलं होतं. मंदिरासमोरच्या दुसऱ्या वाटेने निघालो. सपाट तळव्याचे माझे बूट उतरताना मला हापटवणार याची भीती असल्याने आधाराला काठी शोधत होतो. पण नाय गावली. उतरून पुन्हा घोणसपूरच्या मंदिरात आलो. क्षणभर टेकून पुन्हा निघालो. दरम्यान मी काठीसाठी मारत असलेल्या आर्त हाकांमुळे द्रवलेल्या मामांनी एक भक्कम वासा माझ्या हाती दिला आणि मग मी रूबाबात निघालो. वाटेत गवा भेटेल याची अपेक्षा होती; पण नाही म्हणजे नाही! फक्त पाऊलखुणा तेवढ्या दिसल्या. येताना उमेशच्या पायाला पुन्हा एक जळू चिकटली. तिला खेचून काढावी लागली. बाकी मंडळी सुरक्षित राहिली. खाली आलो. हातलोट गावातल्या नदीवर मस्त स्वच्छ झालो. मामांनी चहा घेण्याचा आग्रह केला. शेणाने झकास सारवलेल्या जमिनीवर बसून गुळाचा फर्मास चहा ढोसून हुषार झालो. मागे मकरंदगड दिसत होताच. परतीच्या वाटेला लागलो तेव्हा सूर्यदेव डोंगराआड गडप झाले होते. अंधारबन नावाप्रमाणे काळोखलं होतं. मुख्य रस्त्याला लागलो. पाऊस होताच; पण आता डांबरट रस्त्यामुळे काळजी नव्हती.
गाडी वेगाने धावायला लागली... गडाची ती डेंजर वाट पुन्हा आठवायला लागली... पण आम्ही पुढे जात होतो आणि एखाद्या ढाण्या वाघाप्रमाणे भासलेला तो मकरंदगड काळोखाच्या पांघरूणात गडप झाला होता...