केंद्रपाडा - समृद्ध जैववैविद्ध्य आणि अनोखी पर्यावरण व्यवस्था असलेल्या ओरिसातील भितरकणिका राष्ट्रीय उद्यान, जागतिक वारसाहक्क यादीत समावेशासाठी सज्ज झाले आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटनेतील (युनेस्को) तज्ज्ञांच्या एका पथकाने, २७ अन्य प्रस्तावांमधून भितरकणिकाची निवड केली आहे, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले.

जागतिक वारसाहक्क यादीत आतापर्यंत ओरिसातील केवळ कोणार्कच्या सूर्यमंदिराचा समावेश झाला आहे. विभागीय वनाधिकारी आणि राजनगर खारफुटी आणि वन्यपशू विभागाधिकारी पी. के. बेहरा म्हणाले, की वन खात्याने यापूर्वी 'युनेस्को'कडे भितरकणिकाचा यादीत समावेश करण्याबाबतचा प्रस्ताव पाठवला होता. या परिसरात राहणा-या नागरिकांमुळे येथील अद्वितीय पर्यावरण व्यवस्था आणि खारफुटीच्या जंगलांना धोका निर्माण झाला आहे. मात्र, तरीही विविध प्रकारच्या वनस्पती, वन्यपशू आणि कीटकांमुळे हा प्रदेश, नैसर्गिक साधनसंपत्तीचे विशाल भांडार आहे.

बेहरा म्हणाले, की देशातील खारफुटीची सर्वात मोठी जंगले याच प्रदेशात आढळतात. पापुआ न्यू गिनीनंतर जगातील भिरतकणिकाचा दुसरा क्रमांक लागतो. हे राष्ट्रीय उद्यान २१५४.२६ चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरले आहे. त्यापैकी भितरकणिका वन्यपशू अभयारण्य आणि राष्ट्रीय उद्यानाचे क्षेत्र ६७२ चौरस किलोमीटर आहे. त्याशिवाय गढीमाता (जल) अभयारण्याने १,४३५ चौरस किलोमीटर आणि महानदी त्रिभुज प्रदेशाने ४७.२६ चौरस किलोमीटर क्षेत्र व्यापले आहे.