विजेचा लखलखाट नसलेल्या ग्रामीण भागाप्रमाणे, दिव्यांची आतषबाजी करणाऱ्या शहरांतूनही स्वच्छ आणि चांदण्यांनी भरलेले आकाश दिसू शकेल काय? अन्य वेळी याचे उत्तर नाही असेच असेल. मात्र, २८ मार्चच्या शनिवारच्या रात्री साडेआठ ते साडेनऊ या एका तासात, शहरातही चमचमणाऱ्या चांदण्या पाहण्याचा आनंद घेता येऊ शकेल. 'विश्‍व प्रकृती निधी'(डब्लूडब्लूएफ)ने शनिवारची रात्र 'अर्थ अवर २००९' म्हणून पाळण्याचे सर्व देशांना आवाहन केले आहे. या दिवशी एक तासासाठी जगातील १,७६० हून अधिक शहरांमधील विजेचा वापर थांबविला जाणार आहे.

वातावरणातील कार्बनडाय ऑक्‍साईडचे प्रमाण कमी करण्याचा हा सर्वांत सोपा आणि प्रत्येकाला साध्य होईल, असा उपाय आहे. कार्यालयांतील दिवे आणि अन्य सर्व प्रकारची उपकरणे पूर्णपणे बंद ठेवून आणि घरांतही सर्व प्रकारची उपकरणे 'स्टॅंडबाय मोड'वर न ठेवता पूर्णपणे बंद ठेवून या मोहिमेत सहभागी होता येईल. या काळात डिझेल जनरेटरचा वापर केला जाणार नाही.

संगणक कंपनी ह्युलेट पेकार्डने (एचपी) 'डब्लूडब्लूएफ'शी 'हरित तंत्रज्ञान सहयोगी' म्हणून करार केला आहे. त्यानुसार पर्यावरणातील बदलांना कारणीभूत ठरणाऱ्या कारणांची माहिती आणि त्याच्या धोक्‍याची माहिती जनतेपर्यंत पोचविण्यात येणार आहे. 'आपण सर्वजण एकाच महान कार्यासाठी एकत्र आहोत. पर्यावरण बदलाविरुद्धच्या लढ्यात आपण खरोखरीच बदल घडवून आणू शकतो,' असा त्याद्वारे संदेश देण्यात येणार आहे. ह्युलेट पॅकार्ड या कंपनीने या एका तासासाठी, भारतातील सर्व 'एचपी' कार्यालयांमधील विजेचा वापर थांबविण्याचा निर्णय घेऊन पुढाकार घेतला आहे.

आपण हे करू शकतो...

- कुटुंबीय आणि मित्रांसह त्या रात्री एखाद्या बागेत सहल आयोजित करा आणि स्वच्छपणे दिसणारे तारे ओळखता येतात का ते पाहा

- मेणबत्त्यांच्या उजेडात रात्रीच्या जेवणाचा आनंद घ्या

- तुमच्या अनुभवांचे व्हिडिओ चित्रण करा, छायाचित्रे काढा. ते 'यूट्यूब' व 'फ्लिकर'वर अपलोड करता येतील. http://www.flickr.com/groups/earthhour2009global/ आणि http://www.youtube.com/group/earthhourglobal> असे त्यांचे अॅड्रेस आहेत.