म्यानमार, लाओस, थायलंड आणि कंबोडियाची जीवनवाहिनी मानली जाणारी मेकाँग नदी, नैऋत्य चीनमध्ये उगम पावते. सुमारे ४,२०० किलोमीटरचा प्रवास करून, ही नदी दक्षिण चीन समुद्रात विलीन होते. या लांबलचक नदीचे खोरे वनसंपत्तीने परिपूर्ण आहे. या सुपीक खो-यात मोठ्या प्रमाणावर भाताचे पीक घेतले जाते. या नदीला अनेक लहान-मोठ्या नद्या, ओढे, नाले येऊन मिळत असल्यामुळे, नदीचा विस्तार खूपच मोठा आहे. पर्यावरणदृष्ट्या अत्यंत समृद्ध असलेल्या या नदीच्या खो-यातील लोकसंख्या आहे साडेसहा कोटी.

 मेकाँग नदीच्या खो-यात वांशिकदृष्ट्या विविध प्रकारच्या लोकांचे वास्तव्य आहे. आदिवासींची संख्याही मोठी आहे. गेल्या अनेक शतकांत येथील जनसमूहाने धार्मिक स्थित्यंतरेही पाहिली आहेत. स्थानिक साधनसामुग्रीचाही मोठ्या प्रमाणात या लोकांनी वापर केला आहे. या नदीच्या खो-यातील जनजीवन साधारणपणे शेतीवर अवलंबून आहे. गेल्या काही शतकांपासून त्यांनी शेतीच्या तंत्रामध्येही मोठ्या प्रमाणात बदल करून स्थानिक साधनसामुग्री जास्तीतजास्त वापरण्याचा आणि त्याचबरोबर तिचे जतन करण्याचाही प्रयत्न केला आहे.

 वनसंपत्तीने परिपूर्ण आणि अनेक लहान-मोठ्या नद्यांमुळे हा प्रदेश सुपीक बनला आहे. मेकाँग ही सर्वात मोठी नदी. ही नदी जीवनदायिनी असल्यामुळे तिचा अधिकाधिक लोकांना उपयोग व्हावा, यासाठी ती ज्या देशातून वाहते, तेथील सरकारांनी नदीवर धरणे बांधली आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाच्या पुढाकाराने १९५० मध्ये स्थापन झालेल्या मेकाँग समितीतील अभियंत्यांनी मुख्य नदीवर सात मोठी धरणे बांधण्याची योजना आखली होती. मुख्य नदीला येऊन मिळणा-या लहान-मोठ्या नद्यांवरही शेकडो धरणे बांधण्याची त्यांनी शिफारस केली होती. मात्र ७० आणि ८० च्या दशकात इंडोचायना युद्धामुळे विकासाची विविध कामे रखडली. परिणामी संयुक्त राष्ट्रसंघाची योजना काही वर्षे तरी धूळ खात पडून राहिली.

 मेकाँक नदीचे खोरे नैसर्गिक साधनसंपत्तीने ठासून भरले आहे. चीनमध्ये उगम पावलेली ही नदी, दक्षिण चीन समुद्रात विलीन होताना, प्रवाहातून उच्च प्रतीचा गाळही वाहून आणते. नदीच्या दोन्ही तीरांवर पसरणा-या या गाळामुळे, हे संपूर्ण खोरेच सुपीक बनले आहे. नदीतील मत्स्यजीवनही अतिशय समृद्ध आहे. जैवशास्त्रीयदृष्ट्या मेकाँग नदी जगातील एक अत्यंत महत्त्वाची नदी गणली जाते. दक्षिण अमेरिकेतील अमेझॉन आणि इजिप्तची मुख्य धमनी असलेल्या नाईल नदीनंतर मेकाँगचा क्रमांक लागतो.

 शेती आणि लहान प्रमाणात मासेमारी हा येथील लोकांचा जीवनक्रम आहे. या खो-यात राहणारे बहुतेक सर्व नागरिक, नदीमुळे समृद्ध असलेल्या वन्यजीवन आणि उपनद्यांशी या ना त्या कारणाने संबंधित आहेत. बहुतेक स्थानिक परंपरा आणि रूढी नदीशीच निगडित आहेत. भातलावणीपासून भात कापणीपर्यंत, मासेमारी, बोटींची शर्यत किंवा जलोत्सव हे सर्वच उत्सव नदीशी निगडित आहेत. उपनदीचे उगमस्थान, नद्यांची पूररेषा आणि नद्यांच्या लाटांमुळे निर्माण झालेले सुपीक जमिनीच्या पट्ट्यांवर, स्थानिक लोकांनी स्वतःचे तंत्रज्ञान उपयोगात आणले आहे. शतकानुशतके त्यात बदल करून ते अधिक आधुनिकही बनविण्यात आले.

 कंबोडियातील तोनले सॅप हा मासेमारीमध्ये जगातील एक सर्वाधिक उत्पन्न देणारा प्रदेश गणला जातो. दरवर्षी या प्रदेशात एक लाख टन मासे पकडण्यात येतात. कंबोडियातील ९५ लाख लोकांना प्रोटीन्सचा पुरवठा करणारा हा एक मोठा कारखानाच समजला जातो. शेजारच्या लाओस देशात, अन्नातून शरीराला होणा-या एकूण प्रोटीन्सच्या पुरवठ्यात, मत्स्याहाराचा वाटा ८५ टक्के आहे. मेकाँग नदीच्या वैविध्याबाबत मर्यादित माहिती असल्याचे, शास्त्रज्ञांनीही मान्य केले आहे. नदीत स्थानिक एक हजार माशांच्या जाती आढळतात आणि दरवर्षी माशांच्या नवीन जातींची त्यात भर पडत असते. त्यामुळे नवीन प्रजातीची वर्गवारी, प्रजननाचा कालावधी, खाण्याच्या सवयी आणि स्थलांतराच्या माहिसाठी अनेकवेळा शास्त्रज्ञही स्थानिक मच्छीमारांची मदत घेतात.

मेकाँग नदीवर धरण बांधण्याची योजना १९५० मध्ये प्रथम मांडण्यात आली. स्टेट आर्मी कोअर ऑफ इंजिनीअर्सचे एक निवृत्त जनरल रेमंड व्हीलर यांनी पूरनियंत्रण आणि पाटबंधारे योजनेसाठी सर्वप्रथम ही कल्पना मांडली. धरणामुळे या प्रदेशाचा विकासही त्यांना अपेक्षित होता. संयुक्त राष्ट्रसंघाने १९५७ मध्ये मेकाँग समिती स्थापन केली या धरणाचे नियोजन करण्याची मुहूर्तमेढ रोवली. अमेरिकी अभियंत्यांनी मुख्य नदीवर सात धरणांची योजना आखण्यात आली. या योजनेची व्याप्ती अतिशय मोठी होती. योजनेतील पहिले धरण व्हिएनतीनजवळील हाय पा माँग येथे नियोजित होते. या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामुळे सुमारे अडीच लाख लोकांचे पुनर्वसन करावे लागणार होते. पाणलोट क्षेत्र तीन हजार ७०० चौरस किलोमीटर क्षेत्र पाणलोटाखाली येणार होते आणि त्यासाठी खर्च अपेक्षित होता १० अब्ज अमेरिकी डॉलर.

 १९७० च्या दशकात सुरू झालेल्या इंडोचायनातील युद्धामुळे, ही योजना आकारास आणण्यात अपयश आले. लाओस, कंबोडिया आणि व्हिएतनाम यांनी मेकाँग समितीतून अंग काढून घेतले. योजनेसाठी उभारलेला निधी कोरडा झाला. मेकाँग आणि उपनद्यांवरील एकूण १८० प्रकल्पांच्या योजना बासनात गुंडाळण्यात आल्या. १९८० च्या दशकात इंडोचायनातील परिस्थितीत सुधारणा होऊ लागली आणि मेकाँग समितीचे पुनरुज्जीवन करण्याची हालचाल सुरू झाली. १९८६ ते ९० या काळात सर्वाधिक निधी उपलब्ध करून दिला तो ऑस्ट्रेलियाने. त्याशिवाय नेदरलँडस्, स्वीडन, स्वित्झर्लंड आणि जपाननेही मोठे निधी दिले. समितीला निधी उपलब्ध करून देणा-या देशांनी सल्लागार आणि व्यावसायिकही दिले. या प्रदेशातील नैसर्गिक साधनसंपत्ती मिळविण्याचा त्यांचा प्रयत्न होता. गुंतवणुकीबाबत या प्रदेशातील देशांनी केलेल्या नव्या उदारमतवादी कायद्यांचा त्यांना आधार होता.

 या नदीवर मोठे धरण आणि जलऊर्जा प्रकल्प उभारण्याची कंबोडिया सरकारची जुनी योजना पुन्हा नव्याने आकारास येऊ लागली. मात्र पर्यावरणवादी आणि काही सामाजिक घटकांनी जोरदार विरोध केल्यामुळे ही योजना पुन्हा बासनात गुंडाळली जाते की काय, अशी भीती व्यक्त होऊ लागली. निदान सध्या तरी परिस्थितीत फारसा काही बदल झालेला दिसत नाही. कंबोडिया सरकारने मात्र याही परिस्थितीत क्रॅटि प्रांतातील सांबोर येथे संपूर्ण नदीच्या रुंदीवर धरण बांधण्याची योजना पुढे रेटण्याचा प्रयत्न चालविला आहे. या संदर्भात २००६ च्या अखेरीस कंबोडिया आणि चायना सदर्न पॉवर ग्रिड कंपनीमध्ये करारही करण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या शक्याशक्यतेबाबत सध्या अभ्यास करण्यात येत आहे. या धरणाबाबत दोन योजना आखण्यात आल्या आहेत. पहिली योजना मेकाँग सचिवालयाने १९९४ मध्ये प्रस्तावित केली होती. नदीच्या संपूर्ण रुंदीवर धरण बांधण्याचा या योजनेत समावेश आहे. या धरणामुळे पाण्याचा फुगवटा ८८० चौरस किलोमीटरपर्यंत पसरला असता आणि ५ हजार नागरिकांचे पुनर्वसन करावे लागले असते. आता या प्रदेशातील लोकसंख्या बरीच वाढल्याचा अंदाज आहे. दुस-या लहान धरणामुळे नदीचा केवळ एक भाग अडविण्याची योजना आहे. पाणलोट क्षेत्रही सहा चौरस किलोमीटर एवढेच राहणार आहे. आतापर्यंत या बाबत कोणतीही अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. तथापि, नॉम पेन्हमधील वरिष्ठ सरकारी अधिका-यांनुसार, सरकारने मोठ्या धरणाचा प्रस्ताव स्वीकारला आहे.
हे धरण २०१९ पर्यंत पूर्ण करण्याचा कंबोडिया सरकारचा प्रयत्न आहे. कंबोडियाच्या उद्योग, खाण आणि ऊर्जा मंत्रालयातील ऊर्जा विकास खात्याचे उपसंचालक तुंग सेरेयुथ यांनी ही माहिती दिली. या खात्याचे मंत्री इथ प्राईंग यांनीही सांबोर प्रकल्पामुळे निर्माण होणा-या पर्यावरण समस्येबाबत विचार चालू आहे. हे धरण झाल्यास, कंबोडियातील हे पहिले मोठे धरण असेल. मात्र पर्यावरण मंत्रालयातील संचालक पुथ सोरिथी यांच्या मते सांबोर प्रकल्पासाठी अद्याप कागदोपत्रीही हालचाल चालू झालेली नाही. उद्योग मंत्रालयातील अधिकारी मात्र याबाबत अळीमिळी गुपचिळी बाळगली आहे.

 या धरणामुळे मत्स्योत्पादनावर मोठा परिणाम होईल, अशी भीती अनेक पर्यावरणवादी संघटनांनी व्यक्त केली आहे. हे धरण झाल्यास दक्षिण लाओसमधून स्थलांतर करणा-या मासळीची आवक कमी होईल. परिणामी तोन्ले सॅप तलावातील मासेमारीवर त्याचा परिणाम होईल. या धरणामुळे नदीतील जैववैविध्यावर विपरित परिणाम होणार आहे, असे मत बँकॉक येथील रिव्हर्स इंटरनॅशनल या संस्थेतील संशोधक आणि विश्लेषक कार्ल मिडलटन यांनी व्यक्त केले आहे. तोन्ले सॅप तलावात देशातील दोन तृतियांश मासळी पकडण्यात येते, हे विशेष.

सरकार आणि पर्यावरणवाद्यांचे हे एक प्रकारचे युद्ध आणखी काही काळ चालूच राहणार आहे. यातून मार्ग काढण्यासाठी मेकाँग समितीनेच पुन्हा एकदा पुढाकार घेऊन, मासळीची आवक कमी होणार नाही आणि धरण होऊन विकासाला चालना मिळेल, असा प्रयत्न करण्याची गरज आहे.