समुद्रात वास्तव्य करणाऱ्या विविध जातींच्या डॉल्फिन आणि देवमाशांसारख्या सस्तन प्राण्यांबाबतचं कुतूहल, शास्त्रज्ञांना नेहमीच खुणावत आलंय. माशांप्रमाणं पाण्यात राहणाऱ्या, परंतु हवेसाठी पाण्यावर येणाऱ्या या प्राण्यांवर गेल्या काही दशकांपासून सातत्यानं नवनवीन संशोधन होत आलं आहे. याच मालिकेतला सर्वांत नवा शोध मात्र स्तिमित करणारा ठरला आहे. डॉल्फिन आणि देवमासे परस्परांशी संपर्क साधण्यासाठी विशिष्ट ध्वनिलहरी निर्माण करतात, हा शोध जुनाच आहे. मात्र, आता डॉल्फिन परस्परांशी चक्क संभाषण करतात, हा नवा शोध अमेरिका आणि ब्रिटनमधील संशोधकांनी लावलाय.

डॉल्फिनच्या ध्वनिलहरी म्हणजे संभाषण आहे काय, या मूळ संकल्पनेतून संशोधनाचा नवीन डोलारा उभारण्यात आला आहे. डॉल्फिन संदेशवहनासाठी निर्माण करत असलेल्या ध्वनिलहरींपैकी आठ लहरींवर त्यांनी प्रामुख्यानं संशोधन केलं. या संदर्भात या अभ्यासचमूचे नेतृत्त्व करणारे आणि स्पीकडॉल्फिन डॉट कॉमचे जॅक कॅसवित्झ यांनी डॉल्फिन भाषेतील ध्वनीचित्र लिपीतून चक्क त्यांच्याशी संभाषण केलं. अमेरिका आणि ब्रिटन या दोन देशांमध्ये त्यावर स्वतंत्र संशोधन करण्यात आलं असलं, तरी दोनही गटांतील शास्त्रज्ञांचा रोख एकाच दिशेनं होता. विशेष म्हणजे, डॉल्फिननी परस्पर संपर्कासाठी ध्वनिलहरी-चित्रलिपी विकसित केल्याबाबत या दोन्ही गटांचं एकमत झालं.

नाम आणि क्रियापदं असलेली साधी आणि गुंतागुंतीची अनेक वाक्यं या शास्त्रज्ञांनी तयार केली आणि ती डॉल्फिनना शिकवली. ही शिकवणी चालू असताना आणखी एक धक्कादायक बाब स्पष्ट झाली आणि ती म्हणजे डॉल्फिननी आपल्या भाषेमध्ये मानवी भाषेचाही अंतर्भाव केला आहे. त्याशिवाय त्यांच्या स्वतःच्या गुंतागुंतीच्या दृश्य भाषेचाही ते उपयोग करतात. कॅसवित्झ म्हणतात, की डॉल्फिन भाषेचा दृश्य परिणाम आता आमच्या लक्षात येऊ लागला आहे. या प्रयोगासाठी त्यांनी जलध्वनिग्राहक यंत्राचा (हायड्रोफोन) वापर केला होता. त्यांनी पाण्यात प्लॅस्टिकच्या काही वस्तू टाकल्या. डॉल्फिननी काढलेल्या ध्वनिलहरी या प्लॅस्टिकवर आदळून निर्माण झालेल्या प्रतिध्वनी नोंदवल्या.

या संशोधक गटातील ब्रिटिश शास्त्रज्ञ जॉन स्टुअर्ट रीड यांनी ध्वनिलहरी दृश्य स्वरूपात आणणाऱ्या सायमास्कोप या अत्याधुनिक यंत्राचा ध्वनिलहरी मोजण्यासाठी वापर केला. या प्रयोगात त्यांनी एका प्रशिक्षित डॉल्फिनची मदत घेतली. त्यांनी प्रयोगादाखल या डॉल्फिनने ध्वनिचित्रलिपीद्वारे दिलेले संदेश त्यांनी दृश्य स्वरूपात दाखवले.

अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्यातील मायामी येथील कॅसवित्झ यांनी विविध आकाराच्या आणि प्रकारच्या प्लॅस्टिकच्या आठ वस्तू पाण्यात ठेवल्या. त्यात प्लॅस्टिकचा घनचौरस, खेळण्यातील बदक आणि फुलदाणीसारख्या वस्तू होत्या. डॉल्फिनने फेकलेल्या ध्वनिलहरी या वस्तूंवर आदळून निर्माण झालेल्या प्रतिध्वनींमधून, त्या वस्तूंच्या स्वरूपाचं एक ध्वनिचित्र तयार झालं. त्यानंतर या वस्तू पाण्यातून बाहेर काढून डॉल्फिनला दाखवण्यात आल्या आणि डॉल्फिननं त्या वस्तू ओळखल्या. त्याची ओळखण्याची अचूकता तब्बल ८६ टक्के होती. या अभ्यासावरून ध्वनिलहरी वस्तूवर आदळून निर्माण होणारा प्रतिध्वनी हा एखाद्या चित्राप्रमाणे असतो, हे स्पष्ट झालं. कॅसवित्झ यांनी हाच प्रयोग अन्य ठिकाणी जाऊन दुसऱ्या डॉल्फिनवरही केला आणि तिथंही त्यांना तोच अनुभव आला. शिकार करताना डॉल्फिन अशाच ध्वनिलहरींद्वारे शिकारीची माहिती अन्य डॉल्फिनना देत असतात.

रीड यांच्या बायो-सायमॅटिक तंत्राचा आधार घेत, कॅसवित्झ यांनी मध्य फ्लोरिडा विद्यापीठातील ख्रिस्तोफर ब्राऊन यांच्या मदतीनं डॉल्फिन भाषेचा एक नवीन आराखडा तयार करण्याच्या प्रयत्नात आहेत. या नवीन तंत्रज्ञानाला त्यांनी सोनो-पिक्टोरिअल एक्झो-हॉलोग्राफिक लँग्वेज, असं नाव दिलं आहे.

गेल्या एक दशकापासून मानव-डॉल्फिन संबंधावर अभ्यास करणाऱ्या द अॅक्वा थॉट फाउंडेशनचे संस्थापक डेव्हिड एम. कोल यांनीही या नव्या संशोधनाबाबत समाधान व्यक्त केलं आहे. पाण्याखाली जिथं दृश्यमानता कमी असते, तिथं डॉल्फिन ध्वनिलहरींचा वापर करून, समोरच्या वस्तूचं चित्र अन्य डॉल्फिनना प्रक्षेपित करत असतात. या संशोधनामुळं या समजाला पुष्टी मिळाली आहे.

गेल्या सुमारे वीस वर्षांपासून डॉल्फिन आणि त्यांच्या भाषेबाबतचा अभ्यास जवळजवळ ठप्प झाला होता. मात्र रीड आणि कॅसवित्झ यांच्यामुळं जगभरातील शास्त्रज्ञ नव्या जोमानं या दिशेनं अभ्यास करतील आणि डॉल्फिन भाषेचा शास्त्रोक्त उलगडा करतील, अशी आशा करण्यास हरकत नाही. या पृथ्वीतलावर बोलू शकणारे केवळ आपणच आहोत का, या प्रश्नाला लवकरच ठोस उत्तर मिळू शकेल. आपल्या आकाशगंगेतील अन्य ग्रहांवर पृथ्वीसदृश जीवसृष्टीचा शोध घेणाऱ्या सर्च फॉर एक्स्ट्रा टेरेस्ट्रिअल इंटेलिजन्स (सेटी) या संस्थेलाही पृथ्वीतलावरच डॉल्फिनच्या रूपात उत्तर मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.