...आणि एकदम भयंकर आरडाओरडा उसळला! तान्हाजीने, सूर्याजीने आणि मावळ्यांनी एकदम इतक्या वीरश्रीने, "हर हर हर हर महादेव' करून शत्रूची कापाकाप करण्यास सुरवात केली. न भूतो न भविष्यति! एकदम छापा. एकदम झडप. किल्ल्यावर एकच भयानक कल्लोळ उसळला. असंख्य मशाली पेटल्या. रजपूतांची धावाधाव उडाली. किल्लेदार उदयभानला ताबडतोब या अचानक आलेल्या हल्ल्याची खबर मिळाली...तान्हाजी आणि उदयभान हे दोघेही भडकलेल्या व वार्‍याने सैरावैरा भळाळणार्‍या आगीप्रमाणे कमालीच्या शौर्याने लढत होते आणि त्या वादळी युद्धात झुंजणार्‍या या पिसाळलेल्या दोन सिंहांची अचानक समोरासमोर गाठ पडली! धरणी हादरू लागली. गड गदगदा हलू लागला. जणू दोन प्रचंड गिरीशिखरे एकमेकांवर कडाडून कोसळली...आणि घात झाला! उदयभानच्या एका वारामुळे तान्हाजीची ढाल तुटली! घात! कवच निखळले! पण तान्हाजीने उदयभानचे वार डाव्या हातावर झेलले. तान्हाजीने आपले मरण ओळखले. रक्त निथळू लागले...आणि आक्रोश उठला, तान्हाजी कोसळला. सुभेदार पडले. मावळ्यांत पळापळ झाली. अशात सूर्याजी पुढे सरसावला आणि पळणार्‍या मावळ्यांना माघारी फिरवले आणि मग मावळ्यांनी शर्थ केली. कोंढाणा स्वराज्यात आला पण सिंह गेला..!"

उमरेठ. सुभेदार तान्हाजी मालुसरेंचं कोकणातील गाव. अंत्ययात्रेसाठी त्यांचा मृतदेह गुंजण मावळातील गुंजवणी, भट्टी, वरोती मार्गानं उमरेठला नेण्यात आला. दुर्गम सह्यगिरीतून जाणारा हा मार्ग तसा दुष्करच. तान्हाजींचा मृतदेह नेण्यात आलेल्या या घाटवजा पाऊलवाटेलाच पुढं मढेघाट असं नाव पडलं. या वाटेनं उमरेठ गाठावं आणि तान्हाजींच्या पराक्रमाच्या कथा आठवाव्यात, असं बर्‍याच दिवसांपासून मनात घोळत होतं. योग जुळून यायला जून महिना उजाडावा लागला.
कार्यालयीन कामकाजातून थोडी उसंत मिळताच, आमचा कंपू चहासाठी एकत्र आला. चर्चा अर्थातच पुढील वाटचालींची. सर्वचजण पावसाची वाट पाहात होते. पावसानं मात्र दडी मारली होती. गेल्या काही वर्षांत पाऊस काहीसा कमीच झाला होता. तरी भटक्यांचं मात्र सह्याद्रीचं वेड कायम होतं. या वेळी एखाद्या गडावर जाण्याऐवजी एखादी डोंगरी वाट आपलीशी करावी, असं एकाचं मत पडलं. त्यावर बरीच भवती न भवती होऊन, अखेर मढेघाट नावाचं स्थळ पक्कं केलं. वास्तविक मढेघाट काय चीज आहे, हे त्या क्षणापर्यंत माहित नव्हतं. महाजन सरांच्या एका पुस्तकात त्याचा उल्लेख असल्याचं समजल्यावर ग्रंथालयात जाऊन ते पुस्तक शोधलं आणि याच ठिकाणी जायचं यावर शिक्कामोर्तब केलं.
मढेघाट तसा पुण्याजवळच. सिंहगड, राजगड आणि तोरण्याच्या घेर्‍यातला. तोरण्याच्या समोरच्या पठारावरून हा मढेघाट जातो. रविवार उजाडला, तसं आम्ही नेहमीचेच यशवंत गुणवंत निघालो. पुण्याहून नसरापूर फाट्यावरून या ठिकाणी जाता येतं. पण आम्ही मात्र वेगळ्या रस्त्यानं जाण्याचं ठरवलं. जरा वेगळी वाट चोखाळण्याचा सोस, दुसरं काय. नसरापुरावरून काय सर्वच लोक जातात. तर आम्ही प्रथम सिंहगड गाठला आणि त्याला डावी घालून त्याच्या पाठीमागं आलो. सुनसान रस्ता. आकाशात ढग होते, पण पावसाचं काही चिन्हं दिसत नव्हतं. शेतकर्‍यांनी नांगरटी वगैरे करून ठेवल्या होत्या. अशा आडबाजूच्या रस्त्यांचं एक बरं असतं. ते अरुंद असले, तरी मोकळे असतात. पुण्यात रोजच विविध प्रकारच्या वाहनांशी डॉजबॉलच्या खेळाप्रमाणं डावी-उजवी करत जावं लागत होतं. इथं मात्र केवळ आपणच. भर्राट वार्‍याच्या संगतीनं बिनघोर जाण्याची मजाही काही औरच असते, नाही?
याच रस्त्यानं पुढं एक बर्‍यापैकी घाट लागतो. घाटाचं नाव विचारायला आजूबाजूला कोणीच दिसत नव्हतं. हरकत नाही. त्यामुळं आमचं काही अडत नव्हतंच म्हणा. एका सुरेखशा यू टर्ननंतर समोर दिसणार्‍या देखाव्यामुळं आम्ही काही क्षण थांबलो. गाडीतून बाहेर पडल्याबरोबर लगेच प्रत्येकानं कॅमेरे बाहेर काढले. इकडं-तिकडं पाहताना समोरच्या डोंगराच्या उतरणीवरील हिरवळीत काही धावताना दिसलं. सर्व नजरा फटाफट त्या दिशेनं वळल्या. आधी ते कुत्रं वाटलं, पण नीट पाहिल्यानंतर ते भेकर निघालं. माझ्या 24 एक्स झूम असलेल्या कॅमेर्‍यात त्याची धावती छबी पकडण्याचा प्रयत्न केला, पण ते बेटं एवढं हुशार की कॅमेर्‍याच्या टप्प्यात थांबलंच नाही!
घाट उतरल्यानंतर काही ओढे लागले. त्यात उगवलेल्या पाणकणसांच्या आडोशानं अनेक पाणकोंबड्या तुरुतुरु इकडून तिकडं धावत होत्या. निसर्गाच्या सान्निध्यात गेल्यानंतर काही वेळा आपलं उद्दिष्ट काही वेगळंच आहे, हे लक्षातच राहात नाही. पण या वेळी आम्हाला गड चढायचा नसल्यानं आम्ही काहीसे निवांत होतो. दिसतील ती सौंदर्यस्थळं चित्रबद्ध करण्याचा प्रयत्न करत होतो. संपूर्ण परिसरच एवढा देखणा होता, की आमच्या प्रत्येक थांब्याच्या ठिकाणाहून पुढं जावं का तिथंच थांबावं, असा प्रश्‍न पडत होता. गुंजवणीजवळ आलो. एकेकाळी स्वराज्याचे राजधानीपद भूषविणारा राजगडाचा हा पायथा. या परिसरात आलं की हृदय उचंबळून येतं आणि शिवकालाचा इतिहासाची स्मृतिचित्रे झरझर डोळ्यांसमोर उलगडत जातात.
गुंजवणीला डावी घालून आम्ही खाली वळालो. आता रस्ता काही ठिकाणी कच्चा मातीचा होता. अत्यंत कमी वर्दळ असल्यामुळं बिनघास्तपणे कुठेही थांबलं, तरी मागून कर्कश्श हॉर्नचे आवाज येणार नाहीत, याची खात्री होती. अनेक लहान-मोठे धबधबे या परिसरात होते. काही ठिकाणी आवर्जून थांबलो. काही वळणं पार केल्यानंतर येणार होतं भट्टी. याच गावातून आम्हाला पूर्वेकडं वळावं लागणार होतं. पण त्यापूर्वी अप्रूप दिसलं. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना रायवळ आंब्यांची मोठ-मोठी झाडं होती. कैर्‍यांनी सर्व झाडं लगडली होती. चार-दोन कैर्‍या पाडल्या, तर शेतकरी काही मागे लागणार नाही, अशी स्वतःच्याच मनाची समजूत करून आम्ही हाताला लागतील ते दगड घेऊन नेमबाजीचा सराव करू लागलो. नेमबाजीचा फायदा झालाच. भट्टी गावात चौकशी करून आम्ही नेमक्या रस्त्यावर वळालो. अशा रस्त्यांवर खरं तर जीपच योग्य. काही ठिकाणी मोठमोठे जांभा खडकांचे सुळके वर आलेले. त्यातून सुखरूप गाडी काढणं, तसं महाकठिण काम. एक चढ चढून वर आल्यानंतर समोरच दिसतो तोरणा. या परिसरातील सर्वात उंच गड. भल्याभल्यांना नमवणारा आणि दमवणारा. कच्च्या रस्त्यानं जाण्यापूर्वी एक छोटंसं तिकाटणं लागलं. या तिकाटण्यावर तुरळक वस्ती होती. तिथंच एक हॉटेलही आहे आणि तिथं चक्क सुग्रास जेवणही मिळतं. मढेघाटात जाण्यापूर्वी तिथं सांगून ठेवलं, की जेवणाची छान सोय होते.
मढेघाट खरा सुरू होतो, तो एका डोंगरावरील पठारावरून मावळतीकडं जाताना. या पठारावर एक स्मृतिचौथराही कोणीतरी बांधून ठेवलाय. पठारावरून एक ओढा वाहात जातो आणि पुढ जाऊन सरळ दरीत कोसळतो. पण ओढ्याचं पाणी खरंच खाली जातं का? समोरून येणारा भन्नाट वारा, धबधब्याचा खाली पडणारा प्रवाह सहजपणे उचलतो आणि पुन्हा पठारावर ढकलून देतो. वार्‍याला त्याची कल्पना नसेल, पण इथं येणारा प्रत्येकजण थक्क होतो, ते दुधाळ तुषारांच्या रुपानं पाण्याच्या फवार्‍यात न्हाऊन निघत असल्यामुळं. काही वेळ तिथं काढल्यानंतर पुढं निघालो. समोरच्या डोंगरावर एक भलामोठा धबधबा कोसळताना दिसत होता. आमची वाट नैर्ऋत्येकडे जात होती. खाली छान वाढलेली हिरवळ आणि पायवाटेच्या दोन्ही बाजूंना कारवीची काळवंडलेली झुडुपं. शहरी भागांत पावसाचा पत्ता नसला, तरी डोंगराळ भागात कमी-जास्त प्रमाणात पाऊस पडतोच. तसा तो येथेही अधून-मधून पडत होताच. कारवीच्या बियांचे घोस अद्याप खाली पडलेले दिसत नव्हते. पावसामुळं या बिया झुडुपांवरच अंकुरल्या होत्या. त्यामुळं वाळलेल्या कारवीला हिरवा मुलामा दिल्यासारखं दिसत होतं. ही वाट अशीच खाली उमरेठपर्यंत जाते, हे आम्हाला ठाऊक होतं. एके ठिकाणी कारवीनं माजलेलं रान एवढं दाट होतं, की पुढची पायवाटच दिसेना. आजूबाजूला बराच धांडोळा घेतला. पण वाट काही दिसेना. अखेर कंटाळून नाईलाजानं परतीचा मार्ग पकडावा लागला.
उलट्या येणार्‍या धबधब्याच्या पठारावर काही काळ घालवल्यानंतर, सर्वांनाच भुकेची जाणीव झाली. सायंकाळचे चार वाजत आले होते आणि आमचं दुपारचं जेवणही, खाली सांगून ठेवल्यामुळं आणलं नव्हतं. परतीच्या रस्त्यावर एके ठिकाणी शेतकर्‍याचे एक कुटुंब कैर्‍या उतरवत होतं. आम्ही जवळ जाताच त्यांनी बर्‍याच कैर्‍या आम्हाला दिल्या. देऊ केलेले पैसेही नाकारले. तिकाटण्यावरील हॉटेलात आलो, तेव्हा भुकेचा डोंब उसळला होता. समोर आलेल्या अन्नावर प्रत्येकजण तुटून पडला. थोडी हुरहुर, थोडे समाधान, थोडा आनंद आणि उमरेठला जाता न आल्यानं बरंच अपयश पदरी बांधून आम्ही पुण्याचा रस्ता धरला.