पावसाळा सुरू झाला आणि सह्याद्रीतील डोंगरशिखरं खुणावू लागली. हिरवीकंच हिरवळ आणि हिरवाईतून फिरण्याचा हा मोसम भटक्‍यांच्या विशेष आवडीचा. बालकवींच्या कवितेतील निर्झर खळाळता ओढा होऊन बेभान धावत असतो तो याच दिवसांत. तृषार्त जमिनीतून गवतांचे भाले उगवतात ते याच दिवसांत आणि निसरड्या पाऊलवाटांवरून पाठींवर सॅक घेतलेले भटके माणसाळलेल्या किंवा निर्मनुष्य गड-कोट-किल्ल्यांवर दिसू लागतात तेही याच दिवसांत.

वाई तालुक्‍यातील धोम धरणाच्या बाजूने जायचं आम्ही ठरवलं. डोंगरांत पाऊस असेल, असा अंदाज बांधत वाई गाठली. वाईच्या ढोल्या गणपतीचं दर्शन घेऊन पुढे निघालो. या भागात चांगला पाऊस झाला होता. ठिकठिकाणी रस्त्यांवर पाणी साचलं होतं. असे पाणीभरले खड्डे चुकवत आम्ही पुढे जात होतो. अखेर उजव्या बाजूला धोम धरण दिसलं. बाजूलाच गाडी लावून आम्ही गोळेवाडी नावाच्या 15-20 घरं असलेल्या वाडीत शिरलो. दुपारच्या जेवणाची काही सोय होते का याची चाचपणी करायची होती. रस्त्याने जाताना एक गोळेवाडीकर भेटला. त्याला महाबळेश्‍वराच्या केट्‌स पॉइंटकडे जाण्याचा रस्ता विचारतानाच "जेवणाची सोय होईल का' याचीही चौकशी केली. त्याच्याच घरी सोय होणार हे समजताच आम्ही लगेच "ऑर्डर'ही देऊन टाकली.

गोळेवाडीपासून साधारण एक किलोमीटर चालल्यानंतर एका वळणावर मोरी दिसते. तिथूनच वर केट्‌स पॉइंटकडे जाणारी पायवाट आहे- सहजासहजी न दिसणारी. चढणीच्या सुरुवातीलाच दाट झाडी लागते. त्यामुळे सरळसोट वाटेचा फारसा त्रास झाला नाही. पहिल्या टप्प्यावर हिरव्यागार कुरणाने प्रफुल्लित करणारं मातीचं एक टेंगूळ लागलं. थोडा वेळ दम खाऊन वरच्या झाडीच्या टप्प्याकडे पुन्हा वाटचाल सुरू झाली. उजव्या हाताला चार-पाच किलोमीटर लांबीचा उभा कातरलेला कडा दिसत होता. त्यावरून एक मोठा धबधबा खाली कोसळत होता. देखावा तर उत्साह अधिक वाढवणारा होता. झाडीचा टप्पा सुरू होताच पावसाला सुरुवात झाली. इथून पुढची वाट घळीतून जाणारी होती. अधूनमधून पाऊस पडतच होता. मुसळधार पाऊस पडू नये असा धावा करतच आम्ही घळीत शिरलो. माथ्यावर पडणारं पावसाचं पाणी याच घळीतून येतं. दैवाने खैर केली आणि वरुणराजाच्या कृपेने केवळ शिडकाव्यावरच निभावलं.

टप्पा बरा म्हणावा असा शेवटचा टप्पा होता. सरळ खडकातली उभी चढण. दगडांमधल्या खाचाखोचांवर हात-पाय रोवूनच वर चढावं लागलं. घळीचा हा अत्यंत चिंचोळा मार्ग होता. खाली जाणाऱ्या पाण्याचा जोर किती असेल याचा अंदाज बांधता येत होता. धबाधबा कोसळणाऱ्या पाण्यापुढे आमचा काही टिकाव लागला नसता हे नक्की. ही खतरनाक दरड चढून विजयी वीरांच्या अविर्भावात आम्ही अखेर केट्‌स पॉइंटवर पोचलो आणि तिथली गर्दी पाहून खचलो. कारण...

कारण आमचा अवतार. घामाने थबथबलेले चेहरे, चिखलाने बरबटलेले बूट. तिथल्या "सॉफिस्टिकेटेड क्राऊड'ने आमच्याकडे विस्फारलेल्या डोळ्यांनी आणि वासलेल्या तोंडाने पाहिलं नसतं तरच नवल!

केट्‌स पॉइंटवर बांधलेल्या रेलिंगवर रेलून आम्ही खालचा देखावा न्याहाळला. महाबळेश्‍वरचया नेहमीच्या मार्गाऐवजी अडखळत, ठेचकाळत का होईना, आम्ही या वाटेने आलो, येऊ शकलो याचा अभिमान आणि आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. आम्ही परतीच्या वाटेला लागलो. खाली उतरताना पुन्हा त्याच हिरव्यागार टेंगळावर थांबलो. तिथे एकाचा "पुरानी जीन्स' गाण्याचा कार्यक्रम झाला. गोळेवाडीत पोचलो. सायंकाळचे साडेचार वाजत आले होते. पोटात कावळ्यांनी कलकलाट सुरू केला होता. गोळेगावच्या त्या गोळेवाडीकराने दाखवलेल्या घरात शिरलो. घरातील लोक हबकलेच. हे कोण आगंतुक शिरले हे पाहण्यासाठी घरातील कर्ता पुरुष दारापाशी धावत येऊन आमची वाट अडवून उभा राहिला. आमच्या जेवणाचं इथेच सांगितलंय ना, या प्रश्‍नाला "इथे जेवणाची सोय होणार नाही' असं ठणकावून सांगण्यात आलं. पडेल चेहरे करून, पोटातील आर्त टाहोकडे दुर्लक्ष करत आम्ही पुन्हा वाटेला लागलो. वाईजवळच्या एका ढाब्यात जेवून रात्री पुण्यात परतलो. पुढच्या वेळी गोळेगावातून जाणाऱ्या वाटेने क्षेत्र महाबळेश्‍वराचं दर्शन घेऊनच परतायचं, असा निर्धार मात्र गोळेवाडी सोडतानाच केला.

पाचूच्या डोंगरातून कोसळत्या धवलधारा...
ताम्हिणीच्या रस्त्यावरील महत्त्वाचा टप्पा. सरळ रस्ता ताम्हिणी घाटाकडे, तर दुसरा उजवं वळण घेऊन लोणावळ्याकडे जातो. रविवारचा दिवस म्हणजे ताम्हिणीच्या रस्त्यावर मरणाची गर्दी. निसर्गाचा आनंद द्विगुणित होण्याऐवजी 'शतवजा'च होण्याची शंभर टक्के गॅरंटी! शिवाय आम्हाला ज्या वाटेने जायचंच नव्हतं त्या वाटेकडे फिरकावंच कशाला? आम्ही रस्त्याला उजवी घेतली. छोटासा घाटरस्ता चढून वर आल्यानंतर उजवीकडे आपोआप नजर वळली आणि अहाहा! खोऱ्यात खाली दिसणारी भातशेती, कौलारू घरं आणि हिरवाईने नटलेली, जलप्राशन करून तृप्त झालेली धरित्री. संपूर्णपणे नागमोडी रस्त्याने जात असताना काय पाहू आणि काय नको असं होऊन गेलं. धबधबे तर असंख्य कोसळत होते.